शक्ती आणि भक्ती चे प्रतिक : आजोबा गणपती
सोलापूरचा इतिहास पहायचा ठरवले तर आजोबा गणपतीशिवाय पूर्ण होणार नाही. महाराष्ट्रच नाही तर सार्या जगात, आज सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात करणार्या लो.
कमान्य टिळकांना ही कल्पना सुचली ती त्यांच्या सोलापुरातील प्रवासात. घटना अशी आहे की, भारत स्वातंत्र्याची लढाई संपुर्ण देशात जोरात सुरु असताना स्वातंत्र्य चळवळीसाठी लोकमान्य टिळक 1885 साली सोलापुरात आले होते. सोलापुरातील त्यांचे मित्र अप्पासाहेब वारद यांच्या ‘इंद्रभवन’मध्ये (साध्य महानगरपालिकेची इमारत) ते नेहमी उतरत असत. अप्पासाहेबांसोबत शुक्रवार पेठेतील पानसुपारीच्या आणि गणेश उत्सवास येणार्या लोकांची संख्या पाहून टिळकांना हे उत्सव सर्वत्र साजरे करण्याची आवश्यकता प्रकर्षाने जाणवली आणी 1893 साली त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना महाराष्ट्रात यशस्वीपणे राबवली
![]() |
आजोबा गणपती |
स्वातंत्रसैनिकांची खाण
भारताच्या स्वातंत्रलढयाच्या इतिहासात सोलापूरला विशेषस्थान आहे. देशात सर्वात शेवटी सोलापूरवर इंग्रजांनी वर्चस्व प्रस्थापित केले. 15 ऑगस्ट 1947 च्या तीन दिवसांपूर्वी पारतंत्र्यातून स्वातंत्र मिळवणारे सोलापूर हे एकमेव शहर आहे. पारतंत्र्यात गेलेले स्वातंत्र लवकर प्राप्त व्हावे यासाठी सोलापूरकरांनी निकराने क्रांती केली आहे. अनेक स्वातंत्रसैनिकांनी प्राणाहुती दिली आहे याची साक्ष इतिहास देतो. या सार्या क्रांतिकारकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचे कार्य आजोबा गणपती मंडळाने केले आहे.
साधारण 131 वर्षापूर्वी आजोबा गणपतीची प्रतिष्ठापना शुक्रवार पेठेत करण्यात आलेली होती. मंडळातर्फे विविध ठिकाणी स्वातंत्र्याची मशाल पेटविण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात येत. या मेळाव्यात होणार्या विविध भाषणे आणि चर्चेमुळे अनेक क्रांतीकारक निर्माण झाले. या मेळाव्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी यांच्यावर होती. कवी संजीव, आंबणप्पा शेटजाळे, शाम सांगळे, शिवलिंगप्पा जिरगे, चिक्कविरय्या स्वामी, माधवराव दिक्षित आदींनी मेळावे गाजवले होते.
शक्ती, युक्ती, भक्तिचा संगम
गणपती बुध्दीची देवता आहे. त्याच्या अचाट शक्ती आणि युक्तीमुळे तो अधिनायक, प्रथम वंद्य ठरला आहे. गणेशाच्या या सार्या गुणांना आजोबा गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या जीवनात प्रत्यक्ष उतरवले आहे. श्रध्दानंद समाजाची स्थापना आणि त्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन कै. सिद्रामप्पा फुलारी यांनी तरुणांमध्यें उत्साह आणि राष्ट्रप्रेम निर्माण करण्यासाठी लाठी-काठी, दांडपट्टा, कुस्ती, आदिचे प्रशिक्षण देेणे सुरु केले. पुढे श्रध्दानंद व्यायाम शाळेचीही स्थापना करण्यात आली. या व्यायामशाळेने अनेक मल्ल निर्माण करून भक्तीबरोबर शक्तीचीही उपासना केली आहे.
आजोबा गणपतीची मूर्ती
1885 मधे आजोबा गणपतीची स्थापना शुक्रवार पेठेतील प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन केली. मंडळाची पहिली मूर्ती निलप्पा उजळंबे, आडव्यप्पा माळगे, व आवटे या मूर्तीकारांकडून घडविण्यात आली होती. अनेक वर्षानी सोलापुरातील सिध्देश्वर मंदिराच्या कळस निर्माणाचे कार्य सुरू असताना त्या कलाकारांकडून सध्याची सुबक आजोबा गणपतीची मूर्ती बनवून घेण्यात आली. पूर्वीची मूर्ती टाकळी येथील भीमा नदीत भक्तीभावाने विसर्जित करण्यात आली.
शिवभावे जिवसेवा
प्रत्येकात ईश्वर आहे हे जाणून समाजहिताचे विविध उपक्रम मंडळातर्फे राबविण्यात येतात. हॉस्पिटलसाठी गरजुंना मदत करणे, वाहन परवाना काढण्यासाठी शिबिराचे आयोजन करणे, रक्तदान करणे, गुणवंत विद्यार्थी सत्कार, मुक्या जनावरांसाठी पाणपोई आदी उपक्रम राबविण्यात येतात.
आजोेबा गणपतीस सोलापुरातील मानाचा गणपती म्हणून मिरवणुकीत विशेष महत्वाचे स्थान असते. मिरवणूक मार्गात अनेक ठिकाणी गणपतीची पूजा केली जाते. मिरवणुकीत 120 जणांचे ढोल पथक, लेझिम, झांज आदी वाद्ये मिरवणुकीची शोभा वाढवतात. उत्सव मूर्ती म्हणुन सुपारीच्या गणपतीचे विसर्जन करून गणेशोत्सवाची सांगता होते.
श्रध्दानंद समाज स्थापना
मंंडळाचे मार्गदर्शक व लाहोर येथील उच्च न्यायालयातील वकील लाला मुन्शीराम यांनी संन्यास घेऊन श्रध्दानंद हे नाव धारण केले होते. एका धर्मांध माथेफिरूने 1996 साली त्यांचा गोळया झाडून खून केला. श्रध्दानंदांना मानणार्या भक्तांनी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रध्दानंद समाजाची स्थापना केली. याच समाजातर्फे मंडळाचे कामकाज पाीहले जाते.
पानसुपारीच्या कार्यक्रमातून टिळकांना प्रेरणा
मंडळाचे सदस्य कै. पसारे यांच्या घरी आयोजित पानसुपारीच्या कार्यक्रमास कै. अप्पासाहेब वारद यांनी लोकमान्य टिळकांना सोबत नेले होते. या कार्यक्रमास येणार्या पाहुण्यांची संख्या आणि त्यांचा सक्रिय सहभाग पाहून टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रेरणा मिळाली.
--
✍
चन्नवीर गुंडप्पा बंकुर
दै. सोलापुर तरुण भारत मध्ये आलेला लेख
Comments
Post a Comment