#श्रीक्षेत्र #कुरवपूर प्रवास

#श्रीक्षेत्र #कुरवपूर प्रवास


फोटो साभार - केदारजी पुजारी, अक्कलकोट

गेल्या काहो दिवसांपासून श्रीपाद श्रीवल्लभ यांची तपोभूमी असलेल्या श्रीक्षेत्र कुरवपूर येथे जाण्याबाबत विचार चालू होता. तसे संकेत ही मिळत होते. आणि योग आज आला. काल मित्र अवधूत तोळबंदे याने विचारले की कुरवपूर ला जायचं का? हो नाही म्हणत जायचे नक्की झाले. मी, दीपक कुलकर्णी आणि अवधूत आम्ही तिघे संध्याकाळी बसव एक्स्प्रेस ने निघालो. आणि थेट कर्नाटकातील जिल्हा केंद्र रायचूर गाठले.

लॉजवर थांबण्याबाबत दीपक आग्रही होता कारण मागच्या वेळी जेंव्हा दीपक आणि अवधूत आलेले तेंव्हा स्टेशनवर थंडीचा त्रास अधिक सहन करावे लागले होते म्हणून. यावेळी ही लॉज वर किंवा स्टेशनवर न थांबत रायचूर शहरातून चालत आम्ही बस स्थानक मध्ये गेलो. तिथे रात्री ३ ते ५ साधारण २ तास झोपून उठल्यावर आम्ही इडलीचा गाडा शोधायला बाहेर पडलो कारण भूकच तेवढी लागलेली.

बस स्थानक च्या बाहेरच एका गाड्यावर गरमागरम मेदू वडे तळतानाचे आणि इडलीचे कुकर दिसले तसे आमचा मोर्चा तिकडे वळला आणि अप्रतिम झालेल्या इडलीवर ताव मारून ०७:०० वाजता येणाऱ्या अतकुर / कुरवपूर च्या बस ची वाट पहात बसलो. हवेतील गारवा आणि मला नेहमी जाणवणारा कर्नाटकच्या मातीत दरवळणारा सुगंध मोहून टाकत होता.

बस आली, चालकाच्या मागेच असलेल्या बाकावर आम्ही बसलो. तिकीट काढायला सुरुवात होत नाही तेवढ्यात कन्नड, मराठी, तेलगू, हिंदी अश्या सर्व भाषेची भेळ बनवून आमचे अवधूत मास्तर बस चालक आणि वाहका सोबत गप्पा मारु लागले. आणि मी निद्रा देवतेला शरण जाऊन झोपी गेलो. जेंव्हा जाग आली तेंव्हा पाहतो तर शहरातील चकाचक सडकेवर धावणारी बस भाताच्या शेतातून निघाली होती. सर्वत्र भात शेतीच. थंडीचे दिवस असल्याने हवेत हलकेसे धुक्याचे साम्राज्य होतेच त्यात ही ताडीचे उंच उंच झाडे, सर्वत्र पाण्यानी भरलेली आणि नुकतीच पेरणी झालेली तर काही ठिकाणी भात लावणी सुरू असलेली शेतीच निदर्शनास पडू लागले. मन प्रसन्न झाले. आपण वेगळ्या जगात आल्याचे भास झाले कारण भात शेती एवढ्या प्रमाणात कधी पहिलेच नव्हते.

अतकूर गावी बस आली आणि आमच्या चक्रधराला (ड्रॉइव्हर) भूक लागली, त्यांनी गाडीला बाजूला लावून अल्पाहार करायला निघून ही गेले. बस मध्ये आम्ही अवघे ६ ते ७ माणस तीही सर्व मराठी मग काय कुठून आलात कसे आलात चर्चा झाली तरी आमचे चक्रधर येईना. माझे चहा प्रेम तर जगजाहीर आहेच. मी बस मधून उतरलो समोर देवीचे मंदिर मंदिरा समोर भले मोठे दगडी चाक असलेले दोन मोठे रथ पाहून हात आपोआपच जोडले गेले. भातशेतीला लागून असलेल्या टपरीकडे गेलो आणि अद्रक टाकून बनवलेला कडक चहा घेत शेताच्या बांधावर निसर्ग पाहू लागलो. आहा... काय ते निसर्ग...

बस चालकाचे येण्याची चिन्हे काही दिसेनात असे पाहून दीपकने त्यांना शोधून आणले आणि अवघ्या ०५ ते १० मिनिटातच बस कृष्णेकाठी पोहोचली. प्रचंड विस्तीर्ण पात्र आणि महा महाकाय दगडांनी भरलेली कृष्णा संथ गतीने वहात होती. एक भली मोठी टोपली ज्याच्या तळाला ताडपत्री आणि डांबर लावून त्यात पाणी शिरणार नाही याची काळजी घेऊन बनवलेली बांबूची बुट्टी जीचा वापर जहाजाप्रमाणे केला जातो हे इथे सर्रास पहायला मिळत होते. त्या बुट्टीत ९ ते १० जण सहज बसून अर्धातासाने कुरगड्डी म्हणजेच कुरवपूर च्या बेटावर आम्ही पोहोचलो.

बेटावर साधारण एक दीड किमी पायपीट करून गेले की श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या मंदिराचे दर्शन होते. कर्नाटक आणि तेलंगणाच्या सरहद्दीवर असलेल्या कृष्णेच्या प्रवाहाला छेदत वर आलेल्या कुरुगड्डी हे बेट दत्त संप्रदायातील पाहिले अवतार पुरुष श्रीपाद श्रीवल्लभ यांची तपोभूमी आहे. याची महती प्रचंड आहे. दत्त संप्रदायातील अनेक महत्वाची ठिकाण टेंभे स्वामींनी शोधून काढले याही तपोभूमीचा शोध स्वामींनीच केला. "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" हा सिद्ध मंत्र इथेच प्रसवला. १४ वर्ष सद्गुरू श्रीपाद श्रीवल्लभांनी येथे तप केला. या स्थानाबद्दलची महती श्री गुरुचरित्राच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली आहे. त्याबद्दल अधिक लिहीत नाही.

सकाळी साधारण ९ वाजता गोपुरातून मंदिरात प्रवेश केला. मंदिराची नित्य पूजा सेवा करणारे श्री भट्ट पुजारी यांच्या घरासमोरील जुन्या दगडी सभा मंडपात आम्ही सामान ठेवले आणि नदीवर स्नान करण्यास निघालो. मंदिराच्या चहूबाजूने दगडी सभा मंडप आहे त्याचाच वापर घर आणि भोजन कक्ष किंवा आलेल्या भक्तांच्या निवासासाठी म्हणून केला जातो. बेट उतरत तेलंगणाच्या बाजूने असलेल्या कृष्णामाईत स्नान करून सोवळे नेसून आम्ही मंदिरातील गर्भ गुडी (गर्भगृह) मध्ये प्रवेशलो. (गर्भगृहात पुरुषांना धोतर पंचा याच वस्त्रात प्रवेश बंदनकारक आहे, ज्याला सोवळे ही म्हणले जाते) ग्रॅनाईट च्या मोठमोठ्या दगडांनी बनवलेले पुरातन मंदिरात प्रवेश करताच मन प्रसन्न झाले. गर्भ गृहात उजव्या बाजूला पाहिले की श्रीपाद श्रीवल्लभ यांचे दर्शन होते. मन प्रसन्न करणारी शांतता, अष्टगंधाचा दरवळणारा सुगंध यामुळे साऱ्या दुःखांचा विसर होतो. आणि देवाला आपोआप शरण जातो. स्वामी श्रीपाद श्रीवल्लभ इथे कायम विराजमान असतात, त्यांच्या पादुकांचे नित्य पूजन इथे होते. अवधूत च्या घरून आणलेले नैवेद्य पुजारींच्या हातात देण्यात आले त्यांनी आरती करून नैवेद्य दाखवले आणि इथे आल्याचे सार्थक झाले. नैवेद्याचे प्रसाद सर्वांना देऊन कानावर पडत असलेले गुरुचरित्र पारायण ऐकत मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून मनोभावे नमन करून मंदिराच्या बाहेर पडलो.

श्रीपाद श्रीवल्लभ यांनी तप केलेल्या वटवृक्षाच्या सानिध्यात काहीवेळा घालवून टेंभे स्वामींनी चतुर्थाश्रमात ज्या गुहेत चातुर्मास केला त्या गुहेत जाऊन आलो. प्रचंड अंधारात समोरील काहीच काहीच दिसत नसतानाही समोर साक्षात शिव विराजमान आहेत असा भास व्हावा आणि एक क्षण नागराज असल्याचे भास होऊन जीव घाबरला. पुढच्याच क्षणी देव आहे भिण्याचे काय कारण असे म्हणत हात जोडले जावे आणि तिथल्याच एका साधकाच्या मोबाईल बॅटरीने समोर पहावे तर खरेच शिवलिंगाचे दर्शन व्हावे हे गुरुकृपाच. दासोहातील लोणचे भात सांबर प्रसाद घेऊन पुन्हा बुट्टीतुन कृष्णामाई ओलांडत आम्ही तेलंगणा मधील मकतल - रायचूर मार्गे साक्षात ईश्वर दर्शन, अनेक आशीर्वाद अनुभूती घेऊन सोलापूरला परत निघालो.

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

✍️ चन्नवीर गुंडप्पा बंकुर, सोलापूर

Comments

Popular posts from this blog

उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे'

शक्ती आणि भक्ती चे प्रतिक : आजोबा गणपती