मी लालपरी
मी लालपरी
✍🏻 - चन्नवीर बंकुर, सोलापूर
8983040108
लालपरी....
कुणा अनामीकाने मला हे नाव दिलं. अतिशय सुंदर, मला खु......प आवडलं, शहारून गेले हे नाव ऐकून लालपरी.
रोज पहाटे गाव जागं व्हायच्या आधी मी अनेक गावांत जाते गावातील माझ्या आप्तांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहचवायला. होय माझे आप्तच. रोज माझ्या सोबत प्रवास करताना त्यांचे अनेक सुखदुःख ते मला सांगतात. मुलगा मोठा झाला... सुनबाई खूप छान आहे... नातू जन्मला... भावकितील वादामुळे पोलीस प्रकरण... हाणामारी... आजारपणं... गावातील जत्रा... पाऊस छान झाला... पेरणी... असे एक ना अनेक हितगुज माझ्यासोबत करणारे माझे आप्तच असणार ना?
आज हे सगळं तुम्हाला सांगण्यास कारण मी आज एकटी पडली आहे. आज माझा चालक आणि वाहक दादा आलेच नाही. आज मी डेपो मध्ये एकटीच आहे. मला एकटेपण सहन होत नाही. रोज अनेक मित्र मैत्रिणी नातेवाईकांना भेटणारी मी आज एकटीच. का असे झाले यात माझी काय चूक? माझा काय दोष? मी एकटी असले तरी मला काळजी वाटते त्या आजीची,... तिच्या पायाला जखम आहे आणि साखरेचा आजार असल्यामुळे तिला रोज तालुक्याला यावं लागतं डॉक्टर कडे दाखवायला. आज ती माझी वाट पहात असेल. तालुक्याला, शहरात शिकणारे अनेक मुलांचे आई बाबा गावात आणि विदयार्थी तालुक्याच्या बस स्टॉप वर माझी वाट पाहत असतील डब्यासाठी. मी गेले नाही तर ही मुलं उपाशी राहतील... बिचारे. मला माझ्या लहान मित्रांची आठवण येत आहे ज्यांना मी रोज शाळेच्या दारात सोडते. शाळेत जाताना मला टाटा करणारे ते हात आणि संध्याकाळी लवकर ये असे सांगणारे त्यांचे डोळे आठवत आहेत. त्यांना आठवलं की का माझे डोळे ओले होत आहेत. असे अनेक जण आहेत जे माझी वाट पाहत आहेत.
आत्ताच डेपो मधला वॉचमन दादा कुणाला तरी सांगत होता, बाहेर आंदोलन सुरू आहे. आंदोलक हिंसक बनले आहेत आणि दगड मारत आहेत. जाळपोळ सुरू आहे. खरंच हे सगळं सुरू आहे का?? नसेल, अस काही कसे करतील ते? ते तर रोज माझ्या सोबत असतात, रोज मी त्यांना त्यांच्या योग्य ठिकाणी सोडून येते. त्यांची 58 आंदोलन सुरू असताना मी कितीतरी वेळा त्यांच्या जवळून गेले आहे तेंव्हा त्यांनी मला काहीच नाही केलं. वॉचमन दादा खोटं बोलत असेल. पण वॉचमन दादा का खोटं बोलेल? काल बार्शी वरून माझी जोडीदार येत असताना तिला अडवलं आणि दगडाने मारलं असं मी ऐकलं. का असे झाले असेल? रात्री उशिरा मला समजलं की अनेक ठिकाणी माझ्या सख्या लालपरींना जाळण्याचे प्रयत्न झाले. अनेक लालपरी जळून नष्ट झाल्या. किती हे भयंकर. तुम्ही तर माझे नातेवाईक ना? की मीच फक्त असे समजते आहे?
मी लालपरी आहे. काहीजण मला लालडबा म्हणतात, डबडं म्हणतात, मला वाईट वाटतं.... पण हरकत नाही. तुम्ही मला भंगार म्हणता हरकत नाही. खराब रस्त्यामुळे मी उशिरा येते तेंव्हा तुम्ही माझ्यावर रागावता, हरकत नाही. पण तुम्ही तुमच्या मागणीसाठी मला जाळता, माझे तोंड फोडता तेंव्हा मला भयंकर यातना होतात हे तुमच्या लक्षात नाही का येत? माझ्या रस्त्यावर न धावण्यामुळे सरकार पेक्षाही गावागावातील आजी-आजोबा, आई-बाबा, आजारी मनुष्य, गरीब माणसं, शाळेत जाणारे विदयार्थी, त्यांच्या भविष्याचंही अतोनात नुकसान होते हे का लक्षात येत नाही? मला काहीही म्हणा पण मला डेपोत थांबण्याची वेळ आणू नका. मी रस्त्यावरच छान दिसते. हे एकच आंदोलन नाही असे अनेक आंदोलन या पूर्वी झाली तेंव्हा ही मीच दगडांचा मारा खाल्ला, पुढे ही कदाचित होतील. पण कृपया पूर्वी केल्यासारखे छळ पुढे माझ्यावर करू नका. मी लालपरी आहे आपलीच सेवा करते नुकसान जेवढे माझे होत आहे त्याहून अधिक आपले ही होत आहे. आंदोलने करा मागण्या मान्य करून घ्या पण मला मारू नका मला जाळू नका. 🙏🏻🚍
Comments
Post a Comment