कोरोना योद्धा शीतल

शीतल नेहमी प्रमाणे लवकरच उठली. नेहमी प्रसन्न आणि नावाप्रमाणेच शीतल असणाऱ्या शीतलला अलीकडे वातावरणातील बदल अस्वस्थ करत. आज ही सकाळी तिला असेच जाणवले. सकाळी लवकर उठून सडा सम्मार्जन, देवपूजा, स्वयंपाक उरकून घरातून बाहेर पडायला 7 - 7:15 वाजलेच 7:30 ची बस पकडायची घाई होतीच. ती चुकली तर दिवसाच गणित चुकलंच समजायचं.
शीतल मुंबई मधल्या एक संस्थेत काम करते. मुंबई म्हणले की धावपळ पाचवीला पुजलेलेच. रात्री उशिरा झोपणे, पहाटे लवकर उठणे आणि धावत पळत लोकल पकडणे हे मुंबईतील माणसे महाभारतातील अभिमन्यू प्रमाणे पोटात असतानाच शिकून येतात. शीतल ही त्यातलीच. पण गेले काही दिवस मुंबईतील हवा अधिकच दुषीत झाली आहे. कोरोना आणि टाळेबंद (लॉकडाऊन) मुळे जनजीवन ठप्प असल्याने प्रदूषण तर कमी झालं, मात्र कोरोनाने मुंबईत जे चित्र निर्माण झाले ते प्रचंड निराशपूर्ण भीतीदायक आहे. शीतल सरकारी कामातच असल्याने तिला कोरोनाच्या बाबती माहिती लवकर मिळते.
आज थोडी धावपळ झाली पण बस मिळाली. शीतल आवरत असताना भार्गव बाईक तयार ठेवूनच असायचा. शीतल पळत पळत आली, की लगेच भार्गव बसस्टॉपकडे घेऊन जायचा. आज ही भार्गव मुळेच बस मिळाली. लोकल सुरू असलेकी इतकी धावपळ होत नसे. एक तर सार्वजनिक वाहतूक अतिशय कमी सुरू होत्या, त्यामुळे सकाळची ही बस पकडणे बंधनकारकच होऊन जायचं. अडीच एक तास प्रवास करून शेवटी 9:30 वाजता शीतल ऑफिसला पोहोचली. मागील तीन दिवसांपासून झोपडपट्टीतील आरोग्य केंद्राच्या कामावर तिची नियुक्ती झालेली.

आज स्क्रिनिंगचे काम हाती घेतलेले. पण आरोग्य केंद्रावरील प्रचंड गर्दी मुळे तिला दुपारपर्यंत तिथेच अक्षरशः थांबून काम करावे लागले. अशिक्षितपणामुळे आरोग्य विषयात जागरूक नसलेले, गरीबी आणि दाट लोकवस्ती मुळे अस्वच्छ राहणीमान, याची कमतरता होती की काय कोरोना मुळे उपासमारीची वेळ. चळवळीतून आल्याने अश्या दीनहीन स्थिती मध्ये जीवन जगणाऱ्या झोपडपट्टी मधील लोकांच्या आरोग्यासाठी थांबून काम करण्याची शीतलला सवय होतीच. दुपार नंतर नियोजित काम करण्यासाठी शीतल आणि तिची टीम झोपडपट्टी मधून फिरू लागले. मुंबईतील उकाडा, वर उन्हाचे चटके, तोंडाला मास्क, हातात  हातमोजे या सगळ्याचा त्रास होत असला तरी न थकता एक एक करत शंभर सव्वाशे घरांचे स्क्रिनिंग आज पूर्ण करायचे होतेच.  कुटुंबातील सर्वांच्या आरोग्याबाबत प्रश्न विचारणे, ताप आहे का हे तपासणे, ताप असेल तर पुढील मार्गदर्शन करणे, सगळी माहिती व्यवस्थित नोंदवून घेणे असे काम टीम करत होती. 
कोरोनाच्या भितीमुळे बाहेर जेवता येत नाही, इतकेच काय स्वतः जवळ असलेलेच पाणी अधिक तहान लागले तरच प्यायचे इतके बंधन पाळत काळजी घेत नित्य काम, ही टीम करत होती. आज ही शीतलच्या टीमने 100 एक कुटुंबाचे स्क्रिनिंग पूर्ण केले.
फोटो साभार जयपूर पत्रिका

काम पूर्ण करून शीतल परतीचा प्रवास करू लागली. दिवसभरातील धावपळ उन्हात केलेले स्क्रिनिंग, आरोग्य केंद्रात थांबून केलेले काम यामुळे शीतलला दमायला होत होते. पण अजून घर गाठायला मोठा पल्ला पार करायचा होता त्यामुळे दमून चालणार नव्हते.  या प्रवासात कुणी जवळून गेले तरी तिचा जीव घाबरत होता,  कारण कोरोना संसर्गजन्य असल्याने आपल्या शेजारील व्यक्ती कोरोनाचा वाहक (कॅरिअर) तर नसेल ना ही भीती. मुंबईतील रस्त्यावर माणस तडफडून मेल्याचे तिने ऐकले होते. मुंबईमधील दवाखान्यात प्रेतांची संख्या वाढत असल्याचे ही तिने पाहिले होते. वेळेवर रुग्णवाहिका मिळत नाहीत हे तिला माहीत होते. हॉस्पिटलमध्ये रुग्णाचे होणारे हाल तिला माहीत होते. प्रशासन पूर्ण प्रयत्न करत होतं, मात्र रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढतच होती. यापुढे सारेच हतबल होत होते तरीही कोणी हार मानायला तयार नव्हते. या स्थितीस शीतल खंबीरपणे सामना करत होतीच, मात्र मुंबईतील या चित्रामुळे तिचे मन उदास होत होते. तरीही  मुंबई स्पिरीट मुळे पुन्हा निराशा झटकून कोरोनाच्या युद्धात सक्रिय होण्याचे बळ तिला मिळत होतं.

दोन तीन बस बदलून संध्याकाळी शीतल घरी आली की फिजिकल डिस्टन्स पाळत भार्गव तिचे हसतमुखाने स्वागत करायचा. स्यानेटायजर ने हात स्वछ करून घरात येऊन कशाला ही स्पर्श न करता ती सरळ आपल्या बेडरूम मध्ये गेली आणि तिथून सरळ बाथरूम मध्ये. दिवसभराचा सगळा ताण-शीण डोक्यावर पडणाऱ्या शॉवरच्या थंड पाण्याबरोबर वाहून जात होता. बराच वेळाने ती बेडरूम मधून बाहेर येणार इतक्यात भार्गव गरमागरम चहा सोबत टोस्ट घेऊन बेडरूम मध्ये आला. भार्गव ने आणलेल्या चहामुळे मनावर आलेला ताण ही चहाच्या वाफे बरोबर हवेत नाहीसे झाला.
फोटो साभार इ सकाळ
आणि, ती लगेच रात्रीचा स्वयंपाक बनवायला उत्साहाने किचन कडे वळली....बाहेरच्या करोना सोबतच्या युध्दासोबतच ही एक छोटी लढाई पण तिच आता नित्यक्रम बनून गेला होता.

(शीतल सारखे असे हजारो योध्ये काम करत आहेत त्यासर्वाना आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रणाम.)
-
✍️ चन्नवीर बंकुर, सोलापूर, 8983040108

Comments

Popular posts from this blog

उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे'

#श्रीक्षेत्र #कुरवपूर प्रवास

शक्ती आणि भक्ती चे प्रतिक : आजोबा गणपती